बीड: साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ सातत्याने उल्लेखनीय योगदान देणारे साहित्यिक श्री. भागवत मसणे सरांना यंदाचा प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय पद्मपाणि पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्य सभागृहात काल अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. या राज्यस्तरीय सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये भागवत मसणे सरांच्या कार्याचा प्रामुख्याने गौरव करण्यात आला.
श्री. भागवत मसणे सरांनी आजवर कविता, वात्रटिका, गीते, पथनाट्य आणि एकांकिका लेखनाच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. केवळ लेखनच नव्हे, तर राज्यातील विविध महाविद्यालयांचे स्नेहसंमेलन, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), सांस्कृतिक कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय वाद-विवाद व वक्तृत्व स्पर्धांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून ते परीक्षक म्हणून अत्यंत जबाबदारीने कार्यरत आहेत. त्यांच्या याच अविरत आणि निस्पृह सेवाकार्याची दखल घेऊन त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पल्लवी जाधव मॅडम यांच्या शुभहस्ते मसणे सरांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर सोहळ्याचे मुख्य संयोजक प्राध्यापक दिलीप तरकसे, आदर्श सरपंच जगताप, पोलीस उपनिरीक्षक जाधवर साहेब यांच्यासह सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत विचारवंत आणि मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल बोलताना उपस्थितांनी मसणे सरांच्या कार्याचा गौरव केला. “मसणे सरांसारख्या मार्गदर्शकामुळे अनेक नवोदित कलाकारांना आणि वक्त्यांना दिशा मिळाली आहे,” अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. या पुरस्काराबद्दल संपूर्ण बीड जिल्ह्यातून तसेच साहित्य वर्तुळातून भागवत मसणे सरांवर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

