आ. नमितताई मुंदडा यांच्या प्रयत्नांवर अंतिम शिक्कामोर्तब
अंबाजोगाई: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे नवीन ‘जिल्हा कारागृह वर्ग-१’ स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. बीड येथील एकमेव जिल्हा कारागृहावर वाढलेला ताण कमी करण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी या कारागृहाच्या मंजुरीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले असून ५ मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिसूचना राज्य राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कारागृह आणि सुधारसेवा अधिनियम २०२५ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारने हे नवीन कारागृह घोषित केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मौजे काळवटी, लमाण तांडा येथील सर्व्हे क्रमांक १/अ/५ मधील सुमारे ३० एकर क्षेत्रावर हे भव्य कारागृह साकारले जाणार आहे. या कारागृहाची एकूण क्षमता ५०० कैदी इतकी निश्चित करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला होणारा त्रास कमी होणार आहे. विशेषतः आरोपींना सुनावणीसाठी ने-आण करताना होणारी ओढाताण या निर्णयामुळे थांबणार आहे.
या नवीन कारागृहाच्या सीमा देखील निश्चित करण्यात आल्या असून, उत्तरेस व दक्षिणेस गायरान जमीन, पूर्वेस रस्ता आणि पश्चिमेस सर्व्हे क्रमांक १० अशी याची व्याप्ती असेल. राज्यपाल यांच्या आदेशानुसार सहसचिव सुग्रिव धपाटे यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. आमदार नमितताई मुंदडा यांनी या कारागृहासाठी आवश्यक असलेल्या ३० एकर जागेची उपलब्धता आणि प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. या निर्णयामुळे अंबाजोगाई परिसरातील पोलीस प्रशासनाच्या सोयीसह जिल्ह्याच्या कारागृह व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत
Namita Akshay Mundada .

