आ. नमिता मुंदडा यांचे सहकार्य आणि नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचा पाठपुरावा ठरला निर्णायक
अंबाजोगाई: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या रमाई आवास योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील ८१० लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यासाठी २० कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामध्ये अंबाजोगाई शहराला सर्वाधिक २७८ घरकुलांचा लाभ मिळाला आहे. आमदार नमिता मुंदडा यांचे विशेष सहकार्य आणि नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अंबाजोगाईसाठी हा मोठा निधी प्राप्त करणे शक्य झाले आहे.
रमाई आवास योजनेंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ३० चौरस मीटरचे घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यासाठी एकूण ९८० घरकुलांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते, त्यापैकी प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या छाननीनंतर ८१० पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अंबाजोगाई नगरपरिषदेने पाठविलेल्या यादीनुसार सर्वाधिक लाभार्थ्यांची निवड झाली असून, शहराच्या विकासात आणि गरिबांच्या कल्याणात नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या पाठपुराव्याने मोलाची भूमिका बजावली आहे.सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग यांच्यामार्फत हा निधी संबंधित नगरपरिषदांना वर्ग केला जाणार असून, थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वितरीत केली जाईल.
नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अंबाजोगाईतील एकही पात्र लाभार्थी निवाऱ्यापासून वंचित राहू नये, यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी शासनस्तरावर आवश्यक ते सहकार्य मिळवून दिले. या निर्णयामुळे शहरातील गरजू कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याबदल नगराध्यक्ष मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री पंकजाताई मुंडे आणि आ. नमिता मुंदडा यांचे आभार मानले आहेत.

