अंबाजोगाई: केज विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी सरकारकडे धाव घेतली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना पत्राद्वारे केली आहे.
२२ आणि २३ फेब्रुवारी २०२६ रोजी केज, अंबाजोगाई व बीड तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, बाजरी आणि भाजीपाला पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. काढणीस आलेली पिके शेतातच आडवी पडल्याने आणि पावसामुळे ओली झाल्याने त्यांची प्रत खालावली आहे. अनेक ठिकाणी मळणीसाठी काढून ठेवलेले पीक भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वादळी वाऱ्यामुळे आंबा बागांनाही मोठा फटका बसला आहे. आधीच बाजारभाव समाधानकारक नसल्याने आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बाधित भागांत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आग्रही विनंती आमदार मुंदडा यांनी पत्रातून केली आहे.

