अंबाजोगाई: येथील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ११०० खाटांचे नवीन अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी या रुग्णालयासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि शासनदरबारी केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीला यामुळे मोठे यश मिळाले आहे. या नवीन रुग्णालयामुळे अंबाजोगाई आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार तसेच आधुनिक वैद्यकीय सुविधा त्यांच्या हक्काच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देताना मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा विस्तार करण्यावर सरकारचा भर आहे. या रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे पुरवणे आणि उपचार सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या या ठिकाणी पूर्णवेळ कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने हृदयविकाराच्या उपचारांत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सर्जनची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, लवकरच येथे पूर्णवेळ कार्डिओलॉजिस्टची सेवा उपलब्ध करून दिली जाईल.
रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने एंजिओग्राम मशीनच्या साहाय्याने एंजिओग्राफीसारख्या सुविधा आधीच सुरू करण्यात आल्या असून, भविष्यात या सेवांचा अधिक विस्तार केला जाणार आहे. केवळ हृदयविकारच नव्हे, तर कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उभारण्याचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी स्थानिक जनतेची गरज ओळखून केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प आता प्रत्यक्ष साकारला जात आहे. दरम्यान, रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

