स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील रेडिओलॉजी विभागाचे पुनरुज्जीवन
रात्रीच्या वेळी आपत्कालीन सोनोग्राफी आता होणार शक्य, आ.नमिताताई अक्षय मुंदडा आणि नगराध्यक्ष नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश
अंबाजोगाई: स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रेडिओलॉजी विभागात तब्बल २३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पदव्युत्तर पदविका (PG DNB) प्रवेश प्रक्रियेला यशस्वी सुरुवात झाली असून, एकूण तीन जागांपैकी दोन जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा आणि अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे रुग्णालयात एमआरआय सुविधा कार्यान्वित होऊन प्रोफेसर पदाची नियुक्ती झाली आहे. यामुळे आता रुग्णांना आपत्कालीन स्थितीत रात्रीच्या वेळी देखील सोनोग्राफीची सेवा उपलब्ध होणार असून आरोग्य सुविधेत मोठी भर पडली आहे.
रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रम २००३ सालापासून बंद अवस्थेत होता, ज्यामुळे एमआरआय, सोनोग्राफी यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत होती. ही अडचण ओळखून आमदार नमिता मुंदडा यांनी शासन स्तरावर सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि विभागात प्रोफेसर दर्जाच्या अधिकाऱ्याची ऑर्डर मिळवून दिली. त्यांच्या या प्रयत्नांना नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची देखील मोलाची साथ लाभली. या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे रुग्णालयातील एमआरआय मशिन पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यामुळेच नवीन शैक्षणिक प्रवेशांचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या या विभागात डीएनबी (DNB) स्तरावरील प्रवेश सुरू झाले असून उर्वरित एका जागेचा प्रवेश देखील पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नजीकच्या काळात या अभ्यासक्रमाचे रूपांतर एमडी (MD) पदवीमध्ये होणार असून, यामुळे रुग्णालयाचा शैक्षणिक दर्जा आणि रुग्णसेवा अधिक सक्षम होणार आहे. पदव्युत्तर विद्यार्थी विभागात उपलब्ध झाल्यामुळे आता चोवीस तास रेडिओलॉजी सेवा देणे शक्य होणार असून सामान्य रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
Namita Akshay Mundada

