बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांनी अत्यंत अल्प काळात प्रशासकीय शिस्त आणि विकासाचा धडाका लावला होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर दादांनी जिल्ह्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. त्यांनी सुरू केलेले विकासप्रकल्प आणि जिल्ह्याचा कायापालट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार याच योग्य उत्तराधिकारी असल्याचे मत पक्षाच्या आमदारांनी व्यक्त केले. त्यामुळे पुण्याच्या बालेकिल्ल्यासोबतच आता बीडच्या विकासाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
केवळ सरकारमध्येच नाही, तर पक्षातही सुनेत्रा पवार यांची पकड आता मजबूत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. अर्थ खाते वगळता अजितदादांकडे असलेली इतर सर्व महत्त्वाची खाती आता सुनेत्रा पवार सांभाळणार असून, त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची ही मोठी कसोटी मानली जात आहे.
अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार सज्ज झाल्या आहेत. येत्या ९ फेब्रुवारी रोजी त्या मंत्रालयातील आपल्या कार्यालयातून पदभार स्वीकारतील. दादांप्रमाणेच त्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून आणि प्रशासनावर पकड मिळवून लोकांचे प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याच्या राजकारणातील या मोठ्या फेरबदलाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

