बीड जिल्ह्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या अंबाजोगाई शहरात पत्रकारितेच्या क्षेत्रातील एका नवीन पर्वाचा प्रारंभ झाला आहे. Bhsnews.in या नवीन न्यूज वेब पोर्टलचे उद्घाटन अंबा नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय नंदकिशोरजी (मुंदडा) काकाजी यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या पोर्टलच्या माध्यमातून आता अंबाजोगाईसह जिल्हाभरातील घडामोडी डिजिटल स्वरूपात तत्परतेने वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत.
मान्यवरांची मांदियाळी
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अंबाजोगाईतील राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष महादेवजी मस्के साहेब, अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे अध्यक्ष बळीरामजी चोपणे, मार्गदर्शक वैजनाथ भैया देशमुख, शेख रऊफ भाई आणि साजेद सर, अजय भाऊ राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
तसेच भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रमुख मंदारजी काटे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंडित अण्णा जोगदंड, माजी नगरसेवक प्रशांत भैय्या अदनाक, आनंत काका आरसुळे, शशिकांत नाना गायकवाड, ॲड. कैलासजी चामनार आणि संजय भाऊ साळवे यांनी उपस्थित राहून पोर्टलला शुभेच्छा दिल्या.
”डिजिटल मीडिया काळाची गरज”
यावेळी बोलताना नगराध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा म्हणाले की, “सध्याच्या वेगवान युगात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शहराच्या विकासाला गती देण्यासाठी डिजिटल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. Bhsnews.in हे पोर्टल विश्वासार्ह बातम्यांच्या जोरावर अल्पावधीतच लोकप्रिय होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. ‘लोकमन’चे संपादक संजयजी जोगदंड आणि ‘ऊर्ज उर्दू न्यूज’चे संपादक सय्यद अरेफभाई यांनी डिजिटल माध्यमातील आव्हाने आणि संधी यावर प्रकाश टाकत नवीन पोर्टलला शुभेच्छा दिल्या.
पोर्टलचे उद्दिष्ट
Bhsnews.in च्या माध्यमातून केवळ राजकीय घडामोडीच नव्हे, तर शेती, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे. तत्परता आणि अचूकता ही या पोर्टलची वैशिष्ट्ये राहणार असल्याचे टीमच्या वतीने सांगण्यात आले.
या सोहळ्याला बाळाजी शेरेकर यांच्यासह शहरातील इतर स्नेहीजन, पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवीन उपक्रमाबद्दल Bhsnews.in च्या संपूर्ण टीमवर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

