अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, राज्यातील सोयाबीन, मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभावाने खरेदी करण्यासाठीची ऑनलाईन नोंदणीची मुदत आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार होती, मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी आणि तांत्रिक कारणांचा विचार करून शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यात यंदा सोयाबीनचे उत्पादन समाधानकारक झाले असले तरी खुल्या बाजारपेठेत मिळणारे भाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांना नाफेडच्या खरेदी केंद्रांचा मोठा आधार आहे. मात्र, अनेक ठिकाणी नवीन खरेदी केंद्रांना उशिरा मिळालेली मंजुरी, मनुष्यबळाचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी प्रक्रियेला विलंब झाला होता. परिणामी, अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती.
हीच गंभीर बाब आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळवली होती. त्यांनी पत्रात नमूद केले होते की, जर नोंदणीची मुदत वाढवून दिली नाही, तर शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी दरात आपला माल विकावा लागेल आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवून द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती.
आ. नमिता मुंदडा यांच्या या मागणीची तातडीने दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २९ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत परिपत्रक काढून मुदतवाढीची घोषणा केली. या निर्णयानुसार, आता सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांच्या हमीभावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांना ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, त्यांना आता त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

